पुणे: विश्रांतवाडी परिसरात 12 वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात 52 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. जयसिंग साठे असे आरोपीचे नाव असून तो परिसरातच राहत असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत विश्रांतवाडी परिसरात राहते. 12 सप्टेंबर रोजी घरातील पीठ संपल्याने ती जवळच राहणाऱ्या आरोपीच्या घरी पीठ मागण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर आरोपीने मुलीला हा प्रकार कोणाला सांगू नकोस, अशी धमकी दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने काही काळ हा प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र नंतर तिने धाडस करून घडलेली घटना आपल्या आईला सांगितली.

मुलीने माहिती दिल्यानंतर तिच्या आईने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि अहवालाच्या आधारे प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात आरोपीविरोधात बलात्कारासह पॉक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलिस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर संबंधित गंभीर कलमांची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.






