पुणे: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल दरीत कोसळल्याच्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना काही महत्त्वाचे धागे मिळाल्याची माहिती आहे. या तपासात एका प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि मोठ्या प्रमाणावर मिळालेला डिजिटल डेटा महत्त्वाचा ठरत असल्याचे तपासातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

23 जून रोजी एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांकडे जबाब नोंदवल्याची माहिती आहे. त्याने गडावर केतन आणि सिया यांना एकत्र पाहिल्याचे सांगितले. त्यांच्या मागून चेतन येत होता. उन्हाळा असतानाही त्याने हुडी घातली होती. यामुळे प्रत्यक्षदर्शीचे त्याच्याकडे लक्ष गेले होते.

पुढे गेल्यानंतर सियाने चेतनच्या दिशेने इशारा केला आणि त्यानंतर ती खाली बसल्याचे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. त्याच वेळी चेतन मागून धावत आला आणि त्याने केतनला दरीच्या दिशेने ढकलल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे. या घटनेबाबत विचारणा केल्यानंतर आपल्यालाही किल्ल्यावरून फेकून देण्याची धमकी देण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे घाबरलेल्या प्रत्यक्षदर्शीने काही काळ कोणालाही माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात सुमारे 12 TB डिजिटल डेटा तपासण्यात आल्याची माहिती आहे. 6 मोबाईल, 9 पेनड्राइव्ह, बॅकअप, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिलीट केलेल्या चॅट्सचा फॉरेन्सिक तपास करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही हटवलेला डेटा पुन्हा मिळवल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तपासादरम्यान इंटरनेटवर डेटा कायमचा हटवणे, चॅट हिस्टरी मिटवणे आणि पोलिसांच्या तपासापासून बचाव करण्यासंदर्भात सर्च झाल्याचे आढळल्याचा पोलिस सूत्रांचा दावा आहे. Instagram, WhatsApp, Snapchat आणि ChatGPTवरील डिजिटल हालचालींचीही पडताळणी करण्यात आली आहे.
तसेच रितेश हंगेच्या मोबाईलमधील डिलीट चॅटमधून काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या सर्व बाबी तपासाचा भाग असून त्यांची कायदेशीर पडताळणी होणे बाकी आहे. प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि डिजिटल पुरावे यांची सांगड घालून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






