मुंबई : बँक कर्मचाऱ्यांकडून सोमवारपासून पुकारण्यात येणारा प्रस्तावित 3 दिवसांचा संप आता मागे घेण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रविवारी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारपासून बँकिंग सेवा बंद राहण्याची शक्यता टळली आहे.

रविवारी रात्री सुमारे 9.30 वाजता दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक झाली. या चर्चेत बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, कामकाजातील सुधारणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर काही विषयांवर दोन्ही बाजूंमध्ये सहमती निर्माण झाली.

बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शनिवारी सुट्टी देण्याचा प्रश्न हा होता. या विषयावर IBA आणि UFBU यांच्या वरिष्ठ पातळीवरील समितीची स्थापना केली जाणार आहे. बँक कर्मचारी, ग्राहक आणि बँक व्यवस्थापन या तिन्ही घटकांचा विचार करून योग्य पर्याय शोधण्याचे काम ही समिती करणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पुढील चर्चेत निर्णय होण्याची शक्यता आहे.

याशिवाय स्केल IV आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या PLI म्हणजेच Performance Linked Incentive योजनेवरही चर्चा झाली. कामगिरीशी जोडलेल्या या योजनेबाबत बँक युनियनने काही आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांचा विचार करून योजनेत आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याबाबत IBA आणि UFBU यांच्यात चर्चा सुरू राहणार आहे.
8 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तातील इतर प्रलंबित मुद्द्यांवरही दोन्ही बाजूंकडून चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले आहे.
दरम्यान, संपाची घोषणा झाल्यामुळे 27 सप्टेंबर रोजी रविवारची सुट्टी असूनही काही बँक कर्मचारी कामावर उपस्थित राहिले होते. आता प्रस्तावित आंदोलन मागे घेतल्याने पुढील 3 दिवसांचा बँक संप टळला आहे.






