पुणे: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यात 11 ते 18 जुलैदरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पालखी मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आदेश जारी केले आहेत.

11 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून 13 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे ते सासवड मार्गावरील दिवेघाट आणि बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. पुण्याकडून सासवडकडे जाणाऱ्या वाहनांनी खडी मशीन चौक–कात्रज–कापूरहोळ मार्गाचा वापर करावा. तर सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहने गराडे–खेड–शिवापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

13 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून 14 जुलैपर्यंत सासवड–जेजुरी–वाल्हे–निरा या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या कालावधीत पुणे ते निरा आणि निरा ते पुणे या दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी–पारगाव मेमाणे–सुपे–मोरगाव–निरा या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
15 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाल्हे ते लोणंद या टप्प्यातही वाहतूक बदल लागू राहतील. या काळात पुणे–सासवड–जेजुरी–वाल्हे–निरा मार्गावरील वाहनांनी सासवड–जेजुरी–मोरगाव या पर्यायी मार्गाने प्रवास करावा.
तसेच 15 ते 18 जुलैदरम्यान लोणंद ते फलटण मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. फलटण आणि लोणंदहून पुण्याकडे येणारी तसेच पुण्याहून फलटण आणि लोणंदकडे जाणारी सर्व वाहने शिरवळ मार्गे वळविण्यात येणार आहेत.
पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वारकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.







