लोणी काळभोर, ता. २९ : मोबाईलवर गेम खेळण्यास मज्जाव केल्याचा राग मनात धरून दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवलेला १६ वर्षीय विद्यार्थी घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रिव्हरव्ह्यू सिटी परिसरात घडली असून गुरुवारी (ता.25) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याचा शोध सुरू असून, संबंधित विद्यार्थी आढळल्यास तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले आहे.

आयुष जगदीश कानतोडे (वय १६, रा. फ्लॅट क्र. सी-४१०, स्कायलार्क अपार्टमेंट, रिव्हरव्ह्यू सिटी, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष कानतोडे हा दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवलेला विद्यार्थी आहे. मोबाईलमध्ये गेम खेळण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात तो घरातून निघून गेला.

घरातून बाहेर पडताना “मी हॉटेलमध्ये काम करणार आहे,” असे त्याने कुटुंबीयांना सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मात्र, त्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे २७ जून रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.
दरम्यान, सदर विद्यार्थी किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे यांच्या ८३२९८६९६७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले आहे.







