पुणे: पुण्यात नवीन दुचाकी खरेदीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे 7 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 2 लहान मुलांचाही समावेश असून सर्वांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. हा प्रकार वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील एका रहिवाशाने नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी जवळील गुरुनानक स्विट्स या मिठाई दुकानातून पेढे खरेदी केले. हे पेढे नातेवाईक आणि परिचितांना वाटण्यात आले. पेढे खाल्ल्यानंतर काही वेळातच 7 जणांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणाची माहिती नातेवाईक अश्विनी शेवाळे यांनी दिली. त्यांनी संबंधित घटनेबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

घटनेची माहिती मिळताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर FDA च्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच ज्या दुकानातून पेढे खरेदी करण्यात आले होते, तेथे तपासणी करून पेढ्यांचे नमुने जप्त करण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यातून पेढ्यांमध्ये कोणती भेसळ किंवा अन्य दोष होते का, याबाबतचा अहवाल काही दिवसांत येणार आहे.
दरम्यान, FDA ने गुरुनानक स्विट्स हे दुकान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. चंदननगर पोलिसांनीही या घटनेची प्राथमिक माहिती घेतली असून तपास अहवालात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.







