पुणे: पुण्यातील एरंडवणे परिसरात कुत्रा व्यवस्थित पकडण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका मध्यमवयीन व्यक्तीवर श्वान सोडून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुळवणी महाराज रोडवर २३ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत ४२ वर्षीय व्यक्तीच्या पार्श्वभागासह पायाला कुत्र्याने चावा घेतला.

याप्रकरणी हेमंत किसन फाले यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वेदांत पासलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत फाले रात्रीच्या सुमारास पायी घरी जात होते. जोशी स्वीटसमोरील रस्ता ओलांडून ते फुटपाथवरून जात असताना दोन मुले दोन श्वानांना घेऊन येत होती. यातील काळ्या रंगाचा श्वान अचानक फाले यांच्या अंगावर धावून आला. त्यामुळे त्यांनी संबंधित तरुणाला कुत्रा व्यवस्थित पकडा, असे सांगितले.

या गोष्टीचा राग आल्याने पासलकर याने फाले यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर फाले पुढे जात असताना पासलकरने त्यांना थांब, तुला दाखवतो, असे म्हणत त्याच्याकडील काळ्या रंगाचा कुत्रा त्यांच्या अंगावर सोडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कुत्र्याने फाले यांच्या पार्श्वभागाला तसेच डाव्या पायाच्या मांडीला आणि गुडघ्याच्या मागील बाजूस चावा घेतला. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी तेथून धावत घरी जाऊन पत्नीला घटनेची माहिती दिली.
फाले यांच्या पत्नीने संबंधित व्यक्तीकडे जाब विचारण्यासाठी धाव घेतली असता त्यांच्याशीही वाद घालण्यात आला. यावेळी तिच्या अंगावरही कुत्रा सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर फाले यांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस हवालदार दिवेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.







