यवत, ता. २२ : पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपूर (ता. दौंड) परिसरात भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मुंबईतील २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी यवत पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद ओयस अब्दुलरईस शेख (वय २६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुलरौफ अब्दुलरईस शेख (वय ३४, रा. मुस्लिम नगर, धारावी, मुंबई) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुलरौफ शेख हे वडील अब्दुल रईस शेख आणि भाऊ मोहम्मद ओयस अब्दुलरईस शेख यांच्यासह टोयोटा कोरोला अल्टिस (एमएच ०४ डीवाय ६४४७) या कारमधून मुंबईहून मूळ गावी गुलबर्गा (कर्नाटक) येथे जात होते. २० मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी सहजपूर गावाच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत चहा पिण्यासाठी कार रस्त्याच्या कडेला थांबवली होती.

सर्वजण कारमध्ये बसलेले असतानाच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकने (एपी ३७ टीके ५९८९) कारला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा मागील भाग अक्षरशः चुराडा झाला. कारमध्ये मागील सीटवर बसलेल्या मोहम्मद ओयस अब्दुलरईस शेख (वय २६) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध झाले.
अपघातानंतर जखमी तरुणाला तातडीने उरुळीकांचन येथील सिद्धिविनायक क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाला विचारणा केली असता त्याने आपले नाव श्रवणम श्रीनिवास रामबाबू राव (रा. इलुरू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश) असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२५(अ), १२५(ब), १०६(१), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.







