पुणे : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या खटल्यात आतापर्यंत ५३ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदवण्यात आल्या असून अनेक महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत.

या प्रकरणात वैद्यकीय पुरावे, वैज्ञानिक तपास अहवाल, डीएनए प्रोफायलिंग तसेच बाल-साक्षीदाराची साक्ष यासारखे महत्त्वाचे मुद्दे न्यायालयाच्या नोंदीवर आले आहेत. आता उर्वरित दोन साक्षीदारांपैकी एक सायबर तज्ज्ञ आणि मुख्य तपास अधिकारी यांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू होणार आहे.

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज सुनावणी होत असल्याने या खटल्याचा निकाल येत्या महिनाभरात लागू शकतो. राज्यातील सर्वात वेगाने चाललेल्या खटल्यांपैकी हा एक ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नसरापूर परिसरात १ मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण करून सुमारे ११०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. २९ मे रोजी प्रत्यक्ष साक्षी नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी पीडित मुलीच्या आई-वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली.
त्यानंतर तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांशी संबंधित अनेक साक्षीदारांची साक्ष न्यायालयात झाली. ‘ई-साक्ष’ पोर्टलशी संबंधित अधिकारी, घटनास्थळाची पुनर्रचना करणारे पंच, तसेच सीसीटीव्ही फुटेज जप्त करणारे पंच यांचीही साक्ष नोंदवण्यात आली आहे.
खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुनावणी सुरू आहे. त्यामुळे प्रकरणाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता या खटल्याच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.






