पुणे : एमबीबीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील एका आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने राज्यातील सुमारे 40 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय 47, रा. सिकंदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी हैदराबाद आणि मुंबई येथे फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

येरवडा परिसरातील एका पालकाला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपीने 8 लाख 12 हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 18 मार्च रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान आरोपीला मुंबई पोलिसांनी अन्य एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती समोर आली. त्याला ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. येरवडा पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला तपासासाठी ताब्यात घेतले.
पोलिस तपासात आरोपी आणि त्याच्या साथीदाराने हैदराबाद येथे ‘एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि.’ नावाची कंपनी सुरू केल्याचे उघड झाले. या कंपनीच्या पुणे आणि मुंबईतही शाखा कार्यरत होत्या. सोशल मीडियावर जाहिराती करून विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणातील प्रवेशासाठी मार्गदर्शन आणि प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी मार्गदर्शन शुल्क म्हणून 5 लाख रुपये, तर खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी 3 लाख रुपये आकारले जात होते. प्रवेश मिळाला नाही तर संपूर्ण रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन देऊन पालकांचा विश्वास संपादन केला जात होता. मात्र प्रवेश न मिळूनही पैसे परत न करता फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी फसवणुकीचे प्रकार उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







