लोणी काळभोर, ता. 22 : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा अपघात झाल्याचे घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (तालुका हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात आज सोमवारी (ता.22) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

अनिकेत सूर्यकांत पिठे (रा. उरुळी कांचन) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत पीठे हे पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने दुचाकीवरून चालले होते, त्यांची दुचाकी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थेऊर फाटा जवळ आली असता, त्यांच्या गाडीचा आणि पांढऱ्या रंगाच्या टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात अनिकेत हे दुचाकीवरून खाली पडून रस्त्यावर कोसळले. यावेळी टेम्पो त्यांच्या अंगावरून गेला.या अपघातात अनिकेत हे गंभीर जखमी झाले होते. परंतु, टेम्पो चालक कोणतीही मदत न करता तेथून फरार झाला.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस हवलदार अनिल गायकवाड ,मनिषा नरवडे, पोलीस अंमलदार निखिल मेमाने व त्यांच्या सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी अनिकेतला तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, आता वेळी पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. परंतु लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवून महामार्ग मोकळा केला.







