पुणे: पुण्यातील तुळापूर येथे झालेल्या चर्चित ‘प्रोजेक्ट एक्स’ हाऊस पार्टी प्रकरणात तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या पार्टीत जप्त करण्यात आलेला मोठ्या प्रमाणातील मद्यसाठा हा पुण्यातील डी मोरा क्लबमधून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित क्लबने परवान्याच्या अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तुळापूरमधील एका आलिशान बंगल्यात आयोजित करण्यात आलेली ही पार्टी नियोजित वेळेपेक्षा जास्त काळ सुरू होती. पोलिसांनी कारवाई करत आयोजकांसह अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. छाप्यादरम्यान लाखो रुपयांचा मद्यसाठा, हुक्का साहित्य आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा मद्यसाठा नेमका कुठून आणण्यात आला याचा तपास सुरू होता.

तपासादरम्यान मद्याच्या बाटल्यांवरील टॅग, स्टिकर्स आणि वितरणाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यातून हा मद्यसाठा डी मोरा क्लबशी संबंधित असल्याचे समोर आले. तसेच हा साठा क्लबमधून वाहनाद्वारे तुळापूर येथील बंगल्यात पोहोचविण्यात आल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे.
या प्रकरणात डी मोरा क्लबचे सहमालक सिद्धांत धुवाडी आणि दिशांत धुवाडी यांची नावेही तपासात समोर आली आहेत. एका ठिकाणासाठी मिळालेल्या मद्यविक्री परवान्याचा वापर दुसऱ्या ठिकाणी करण्यात आल्याने उत्पादन शुल्क विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल आणि कारवाईचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर निर्णय झाल्यानंतर संबंधित क्लबवर दंडात्मक कारवाई, परवाना निलंबन किंवा परवाना रद्द करण्यासारखी कठोर पावले उचलली जाऊ शकतात.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पार्टीच्या आयोजनामागील इतर बाबींचीही चौकशी करण्यात येत आहे.







