ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन वृद्धांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास एका भाड्याच्या खोलीतून मुलीच्या किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज येत होता. हा आवाज ऐकून सतर्क झालेल्या शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीची सुटका केली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अख्तर मनियार आणि सलीम शेख अशी असून, दोघांचे वय सुमारे ६० वर्षे आहे. यातील एक आरोपी चहा विक्रेता आहे, तर दुसरा रिक्षाचालक आहे.

पीडित मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. आरोपींनी तिच्या गरिबीचा आणि हतबलतेचा फायदा घेत, तिला फूस लावून या भाड्याच्या खोलीत आणले होते. त्यानंतर तिच्यावर हा अमानुष अत्याचार करण्यात आला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी अख्तर मनियार याने भाड्याने घेतलेल्या या खोलीवर अनेकदा अनोळखी व्यक्ती आणि मुलींचे येणे-जाणे असायचे. त्यामुळे या ठिकाणी एखादे अनैतिक रॅकेट चालवले जात होते का? या दिशेने आता कोळसेवाडी पोलीस सखोल तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी छडा लावत आहेत.
या घृणास्पद घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने गंभीरपणे समोर आला आहे.







