पुणे: पुण्यातील बाणेर परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय मुलीने तरुणाच्या सततच्या जाचाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं आहे. ‘स्वराली’ (नाव बदलले आहे) या अल्पवयीन मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरख सुग्रीव गोरे (वय 21, मूळ रा. जालना) नावाचा तरुण गेल्या काही दिवसांपासून स्वरालीला प्रचंड मानसिक त्रास देत होता. आरोपीकडे स्वरालीचे काही फोटो होते आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो वारंवार देत होता. या ब्लॅकमेलिंगचा छळ इतका वाढला की, अखेर या तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलले.

स्वरालीचा भाऊ दीपक याने दिलेल्या तक्रारीनंतर, बाणेर पोलिसांनी गोरख गोरे याच्याविरुद्ध ‘आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा’ (IPC 306) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.







