पुणे: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादात (Sushama Andhare) शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर जोरदार टीका करत पुन्हा एकदा वातावरण तापवले आहे. चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अंधारे यांनी सोशल (Ashok Kharat Case) मीडियावरून थेट निशाणा साधला. (Latest Marathi News)
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याच्या वेळेवरच प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, हा स्वेच्छेने दिलेला राजीनामा नसून दबावाखाली घेतलेला निर्णय आहे. “जर नैतिकतेची जाणीव असती, तर चाकणकरांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर किंवा किमान काही दिवसांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला असता,” असे अंधारे यांनी म्हटले. त्यांनी पुढे असा आरोप केला की, चाकणकर शेवटपर्यंत पद वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यामुळे हा राजीनामा नसून ‘हकालपट्टी’ असल्याचा त्यांनी दावा केला.

अंधारे यांनी केवळ राजीनाम्यावरच थांबत न राहता अधिक गंभीर मागणीही केली आहे. त्यांनी चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे आणि अटक व्हावी, अशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे या प्रकरणात केवळ राजकीय टीकेपुरतेच नव्हे तर कायदेशीर कारवाईच्या मागण्यांनाही जोर येताना दिसत आहे.
दरम्यान, अंधारे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवरही सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “मोठेमोठे गार केले गंमतमधी” असे स्टेटस ठेवत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर अप्रत्यक्ष टोला लगावला. या पोस्ट आणि स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एकूणच, चाकणकरांच्या राजीनाम्यानंतरही वाद शांत झालेला नसून, सुषमा अंधारे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा मुद्दा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणावरून राजकीय संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.







