पुणे: राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे जिल्ह्यातील एका अंगणवाडी सेविकेने निकृष्ट दर्जाचा वाटाणा आणि भरडा बालकांना दिला जात असल्याचा दावा करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकारानंतर संबंधित सेविकेवर प्रशासनाने कारवाई केल्याचे समोर आले होते.

अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. ९ ते १० शिट्ट्या देऊनही न शिजणारा पांढरा वाटाणा आणि शिजवल्यानंतरही कच्चा राहणारा भरडा लहान मुलांना कसा द्यायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच या अन्नाची तातडीने तपासणी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर आता महिला व बालविकास विभागाने पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. बालकांचे आरोग्य आणि पोषण यांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील अंगणवाड्यांमधील आहाराची ४८ तासांत प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक अंगणवाडीला भेट देऊन तेथे उपलब्ध असलेल्या पोषण आहाराची सखोल तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनानेही अंगणवाड्यांना भेट देऊन आहाराच्या गुणवत्तेची खातरजमा करावी, असे निर्देश आहेत.
अंगणवाड्यांमध्ये आलेला आहार सुरक्षित, योग्य आणि वापरण्यायोग्य आहे की नाही, याची तपासणी करणे अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान आहार खराब किंवा अयोग्य आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तातडीने बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे.
तसेच भविष्यात पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रार आल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. आहाराच्या दर्जाबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्री तटकरे यांनी दिला आहे.







