पुणे : महाराष्ट्रात हवामानाची स्थिती सातत्याने बदलत असून, काही भागात पावसाची हजेरी तर बहुतांश भागात उघडीप पाहायला मिळत आहे. पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला असला, तरी हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे.

आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहून ऊन-पावसाचा खेळ रंगेल. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

मुंबईत पुढील 5 दिवस ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. येथील तापमान 26 ते 31 अंश सेल्सिअसदरम्यान राहील. पुण्यातही रिमझिम पावसाची शक्यता असून तापमान 22 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

दक्षिण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला लागून असलेल्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच समुद्रसपाटीपासून 4.5 ते 5.8 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने राज्याच्या हवामानावर याचा थेट परिणाम दिसून येत आहे. याशिवाय मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला असून तो जम्मू, डेहरादून, शाहजहानपूर, रांची आणि दिघा मार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. राजस्थान, गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्येही मान्सूनची सक्रियता कमी राहणार आहे.पावसाच्या या लहरी पणामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी लागणार असून, आगामी काही दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







