विशाल शिंदे

भोर : वेळू (ता. भोर) येथील वेळू फाट्याजवळ मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवून अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या अपघातात एका दुचाकीस्वाराच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून इतरांनाही दुखापत झाली आहे. तसेच तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वेळू गावच्या हद्दीत, वेळू फाट्याजवळ व्यसनमुक्ती केंद्राच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरीजवळ हा अपघात झाला. बालाजी शिवाजी काकडे (रा. नवले ब्रिज, पुणे; मूळ रा. टाकळी ढोकी, ता. जि. धाराशिव) हा छोटा हत्ती वाहन क्रमांक एमएच १२ डब्ल्यूएक्स ९२४६ घेऊन सर्व्हिस रोडने भरधाव वेगाने जात होता.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून तसेच मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत वाहन चालवत असताना त्याच्या वाहनाची फिर्यादी अभिषेक कुमार अशोक रामकुमार यांच्या वाहनासह इतर वाहनांना जोरदार धडक बसली. या धडकेत अभिषेक कुमार यांना किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. याशिवाय एमएच १३ बीबी ४६७८, एमएच १२ जी २६५१ आणि एमएच १२ एफपी ४९७९ या वाहनांचे नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी अभिषेक कुमार यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बालाजी काकडे याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याची नोंद २१ ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मुंढे करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.








