विशाल शिंदे

भोर : कापूरहोळ ते वारजे असा एसटी बसमधून प्रवास करत असताना ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीच्या अंगावरील तब्बल २ लाख ९३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी राजाराम जगदाळे (वय ६०, रा. वरवे खुर्द, ता. भोर) हे आपल्या पत्नी मनिषा जगदाळे यांच्यासह २० ऑगस्ट रोजी एसटी बसने प्रवास करीत होते. कराड-दादर मार्गे उरण जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच १४ एमएच ३०२५ मधून त्यांनी कापूरहोळ ते पनवेल असा प्रवास सुरू केला होता.

कापूरहोळ ते वारजे दरम्यान बसमधून प्रवास करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन दोन अनोळखी महिलांनी दागिने चोरी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या दोन्ही महिलांनी स्कार्फ बांधलेला असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
या चोरीमध्ये तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, १४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील वेल, सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुले व झुमके तसेच अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण सुमारे २ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटना २० ऑगस्ट रोजी घडली असून याबाबत २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ८ मिनिटांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली. पोलिसांनी दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बसचा प्रवास, संबंधित मार्गावरील थांबे तसेच बसमधील गर्दीचा तपशील तपासला जात असून, चोरीच्या वेळी संशयित महिला नेमक्या कोणत्या ठिकाणी बसमध्ये चढल्या किंवा उतरल्या, याचा शोध घेण्यात येत आहे. परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.







