पुणे: पुणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, वेगाने (Purandar Airport) विस्तारत असलेले आयटी व औद्योगिक क्षेत्र आणि वाढती हवाई प्रवासी संख्या लक्षात घेता पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ (Maharashtra Cabinet Meeting) प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Murlidhsr Mohol) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा करत जमीन अधिग्रहण प्रक्रिया 1 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दीर्घकालीन विकासासाठी हा प्रकल्प निर्णायक मानला जात आहे.

सध्या पुणे विमानतळावर प्रवासी आणि मालवाहतुकीचा प्रचंड ताण असून भविष्यातील वाढत्या मागणीसाठी नवीन विमानतळाची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती. पुरंदर विमानतळ उभारल्यास पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि कोल्हापूर या भागांना थेट आंतरराष्ट्रीय हवाई सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उद्योग, आयटी, पर्यटन आणि कृषी निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, वाढती एअर कनेक्टिव्हिटी ही गुंतवणूक आणि उद्योगवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर पश्चिम महाराष्ट्रासाठी पुरंदर विमानतळ हा दुसरा मोठा पर्याय ठरणार असून मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशिया या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांशी थेट संपर्क प्रस्थापित करण्यास मदत होईल. यामुळे निर्यात वाढ, परकीय गुंतवणूक आणि जागतिक व्यवसाय संधींना चालना मिळेल.
या प्रकल्पामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग आणि कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळणार आहे. विशेषतः फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. तसेच विमानतळ उभारणीमुळे हजारो थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता असून आसपासच्या भागातील पायाभूत सुविधा विकासालाही वेग येणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







