Pune Toll : पुणे : आज 1 एप्रिलपासून पुणे जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल लागू झाला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दरामध्ये सरासरी 5 टक्क्यांची वाढ केली असून हे नवे दर तात्काळ लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक या मार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दरवाढीचा परिणाम सर्व प्रकारच्या वाहनांवर होणार आहे. हलक्या वाहनांपासून ते मोठ्या ट्रकपर्यंत सर्वांसाठी टोल दर वाढवण्यात आले आहेत. नवीन दरानुसार, कार आणि जीपसाठी एकेरी प्रवासाला सुमारे 95 रुपये तर ये-जा करण्यासाठी 130 रुपये मोजावे लागतील. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी एकेरी दर 150 रुपये आणि परतीचा दर 210 रुपये करण्यात आला आहे.

तसेच बस आणि ट्रकसाठी टोल दर 315 रुपये झाला असून, मोठ्या अवजड वाहनांसाठी हा दर 545 ते 815 रुपयांपर्यंत वाढला आहे. या वाढीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना अधिक खर्च सहन करावा लागणार आहे.
यासोबतच टोलनाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. आता फास्टॅगद्वारेच टोल वसुली करण्यावर अधिक कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी फास्टॅग सक्रिय ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा दुप्पट टोल आकारला जाऊ शकतो.
दरवाढ आणि कॅशलेस प्रणालीमुळे प्रवास अधिक वेगवान होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, वाढत्या खर्चामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.






