पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात इंदापूर पोलिसांनी गुरुवारी (२ जुलै) विशेष मोहीम राबवून फॅन्सी नंबर प्लेट तसेच कर्कश आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत ९ वाहनांवर कारवाई करत एकूण ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करून फॅन्सी नंबर प्लेट हटविण्यात आल्या.

अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. वाहनांवर अनधिकृत फॅन्सी नंबर प्लेट लावणे तसेच कर्कश आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांची तपासणी करून संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित वाहनधारकांना शासनमान्य नमुन्याच्या नंबर प्लेट बसविण्याच्या आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल सुहास आरणे, पद्मसिंह शिंदे, अमोल खाडे, अनिल नागरगोजे, अकबर शेख तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल शोभा खरात यांनी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी स्पष्ट केले.







