पुणे: पुणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यावर चौघांच्या टोळक्याने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री साडेआठच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ही घटना घडली.

अक्षय बोंबाळे असे जखमी रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विकी पात्र, रॉकी पात्र आणि त्यांच्या दोन अज्ञात साथीदारांविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोंबाळे हे काम आटोपून कार्यालयासमोरील रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले.

विकीच्या आईला त्याच्या दारू आणि गांजा सेवनाबाबत माहिती दिल्याचा संशय आरोपीच्या मनात होता. याच कारणावरून आरोपींनी बोंबाळे यांच्याशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि हल्ला केला. दोन अज्ञात साथीदारांनी बोंबाळे यांचे हातपाय पकडून ठेवले. त्यानंतर विकीने चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला, तर रॉकीने छातीवर चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात बोंबाळे गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील मोबाईल फोन आणि गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींच्या भूमिकेबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.







