पुणे: राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू (Pune Ring Road) असलेल्या पुणे बाह्य रिंगरोडच्या कामाची सध्या सुमारे 20 टक्के प्रगती झाली आहे. मुख्यत्वे पश्चिम टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, पुढील दोन वर्षांत हा टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक (Pune News) अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. याचबरोबर पूर्व टप्प्याचे कामही सुरू झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रिंगरोडच्या 31 किलोमीटर लांबीच्या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आल्या असून, लवकरच त्या कामाचे आदेश दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएसआरडीसीकडून हा रिंगरोड प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत विभागण्यात आला आहे. सध्या पश्चिम टप्प्यातील काम सुमारे 20 टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळा संपल्यानंतर कामाचा वेग वाढला असून, मे अखेरपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पश्चिम टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2027 अखेरची मुदत देण्यात आली असून, त्या कालावधीत हा टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पूर्व टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी मे 2028 पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्या वेळेपर्यंत संपूर्ण रिंगरोड पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे वसईकर यांनी सांगितले. पूर्वेकडील टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे ते संभाजीनगरदरम्यान ग्रीन कॅरिडोरचे काम सुरू आहे. या ग्रीन कॅरिडोरचा आणि रिंगरोडचा मार्ग काही ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे नगर रस्त्यापासून सोलापूर रस्ता आणि पुढे पुणे-बंगळूर रस्त्याला जोडणाऱ्या रिंगरोडच्या 31 किलोमीटर रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, असा आधी निर्णय झाला होता.
मात्र, नंतर प्राधिकरणाने आपला निर्णय बदलत हे काम पुन्हा राज्य रस्ते विकास महामंडळानेच करावे, अशी सूचना दिली. त्यानुसार आता या कामासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून, येत्या काळात या टप्प्यालाही गती मिळण्याची शक्यता आहे.







