पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी अचानक झालेल्या पावसानंतर शहरात वातावरणात बदल झाला असून शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हवेत वाढलेल्या दमटपणामुळे उकाडा वाढल्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत. आता पुढील काही दिवस हवामान कसे राहणार याबाबत हवामान विभागाने अंदाज जाहीर केला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुणे शहर आणि परिसरात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. आकाशात ढगांचे प्रमाण वाढलेले राहील. त्यामुळे थेट कडक उन्हाचा तडाखा कमी जाणवेल, मात्र दमट हवामानामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी झालेल्या पावसाचा परिणाम तापमानावरही दिसून आला. शनिवारी शहराच्या कमाल तापमानात सुमारे 2 अंश सेल्सिअसने घट झाली होती, तर किमान तापमानातही बदल नोंदवला गेला. शनिवारी पुण्यात कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.
रविवारी आणि त्यानंतरच्या दिवसांत तापमानात पुन्हा किंचित वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी कमाल तापमान सुमारे 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. सोमवारपासूनही उकाड्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 3 दिवस उकाडा आणि दमट वातावरणाचा त्रास कायम राहू शकतो. त्यानंतर तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना काही दिवस अजून उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागू शकतो.






