छत्रपती संभाजीनगर: नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणातही नव्या चर्चांना उधाण आले असून, शिंदे गटाचे नेते आणि समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना सुरुवात झाली असून, शिरसाट यांनी त्यामागील कारण स्पष्ट केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, अभिजीत दीपके यांना भेटण्याची इच्छा यापूर्वीच होती. मात्र त्या काळात भेट घेतली असती, तर त्याचे वेगळे राजकीय अर्थ काढले गेले असते. त्यामुळे जाणीवपूर्वक ती भेट पुढे ढकलण्यात आली होती. आता त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मोठे यश मिळवले असून, माझ्या मतदारसंघातील एका तरुणाने राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. अशा व्यक्तीची भेट घेणे हे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरसाट यांनी पुढे दावा केला की, सरकारने अभिजीत दीपके यांनी मांडलेल्या काही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यातूनच पुढील निर्णय झाले. त्याचबरोबर या आंदोलनाचा वापर करून काही राजकीय पक्षांनी स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला.
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, पेपरफुटीच्या घटना यापूर्वीही अनेक वेळा घडल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला, तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्याची वेळही आली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कायदेशीर तरतुदी करण्याचा निर्णय घेतला असून, नव्या कायद्यानुसार अशा गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्यांना १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेत आवश्यक बदल घडून येतील आणि भविष्यात कोणतेही सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचे धाडस करणार नाही, असा विश्वासही संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.






