पुणे, ता. 16 : चंदननगर परिसरात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आयटीसी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर निशांत कुमार यांची अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असलेली लॅपटॉप बॅग बुधवारी (ता. 15 ) हरवली होती. मात्र, अवघ्या दोन तासांत पोलिसांनी शिताफीने शोध घेत ही बॅग सुरक्षितपणे परत केली.

चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार रमेश मेमाणे व पोलीस अंमलदार सुशील बेंद्रे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. अत्यंत जलद हालचाली आणि शिताफीने शोधमोहीम राबवत त्यांनी अवघ्या दोन तासांत बॅगचा मागोवा घेत ती सुरक्षितपणे हस्तगत केली.
दरम्यान, या हरवलेल्या या बॅगमध्ये ॲपल कंपनीचे मॅकबुक, लॅपटॉप, स्वतःसह संपूर्ण कुटुंबाचे पासपोर्ट, बँकेचे क्रेडिट व डेबिट कार्ड्स तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यामुळे ही घटना अत्यंत महत्वाची मानली जात होती.
पोलिसांच्या या तत्पर आणि कार्यक्षम कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. बॅग परत मिळाल्यानंतर निशांत कुमार यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानत त्यांच्या कामाचे कौतुक केले. या घटनेमुळे पुणे पोलिसांची कार्यक्षमता आणि सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.







