Pune Crime : फुरसुंगी, ता. 16 : ‘आडनाव’ बदलण्यासाठी बहिण भावाच्या जाचाला कंटाळून भेकराईनगर येथील त्रिमूर्ती चौकात राहणाऱ्या एका केटरिंग मॅनेजर तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बहिण भावावर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण रमेश वाघमारे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सोएब शेख (वय 27, व रेश्मा शेख (वय 40, रा. दांडेकर पुल, स्वारगेट, पुणे.) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बहिण भावाचे नाव आहे. याप्रकरणी मयत प्रविण वाघमारे याचा भाऊ प्रमोद रमेश वाघमारे (वय 26) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रवीण 2013 पासून पुण्यात कामाला होता. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून तो रेश्मा शेख नावाच्या महिलेच्या संपर्कात होता. रेश्मा, तिचा भाऊ सोयेब शेख आणि त्यांच्या साथीदारांनी प्रवीणला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले. इतकेच नव्हे तर त्याला वारंवार ब्लॅकमेलही केले जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रेश्मा शेख हिने एका नियोजित कटाचा भाग म्हणून प्रवीणचे लग्न आपल्या ओळखीतील तेजल सिंग नावाच्या मुलीशी 9 डिसेंबर 2025 रोजी जेजुरी येथे लावून दिले. मात्र, लग्नानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली. रेश्मा शेख आणि सोयेब शेख हे प्रवीणवर ‘आमचे आडनाव लाव’ असा सतत दबाव टाकत होते. तसेच तेजलची आत्या फरीदा शेख ही देखील त्याला सतत मानसिक त्रास देत होती.
6 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता प्रवीणने आपल्या आईला आणि भावाला या त्रासाबद्दल सांगितले होते. त्यानंतर भाऊ रिक्षा घेऊन कामावर गेला आणि आई घराबाहेर गेली असताना, घरात प्रवीण आणि त्याची पत्नी तेजल होते. सायंकाळी पाऊणे पाचच्या सुमारास तेजल “मी माहेरी जाते” असे सांगून निघून गेली. आई आणि भाऊ घरी परतल्यावर त्यांना बेडरूमचा दरवाजा आतून बंद आढळला. दरवाजा तोडून आत पाहिले असता प्रवीणने नायलॉनच्या दोरीने सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, प्रवीणला तातडीने रुग्णवाहिकेने हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. प्रवीणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती माने करीत आहेत.







