तेहरान: गेल्या अनेक महिन्यांपासून युद्धज्वाळांमध्ये होरपळणाऱ्या मध्यपूर्वेतून आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इस्रायल, लेबनॉन आणि इराण यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर असून, लवकरच युद्धविरामाची घोषणा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची एक सोशल मीडिया पोस्ट आणि पाकिस्तानची सक्रिय मध्यस्थी यामुळे जागतिक राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

इस्रायली मंत्रिमंडळाने लेबनॉनमधील संभाव्य युद्धविरामावर सविस्तर चर्चा केली आहे. इराण-समर्थित हिजबुल्लाहसोबत सुरू असलेला रक्तपात थांबवण्यासाठी इस्रायल आता गंभीर असल्याचे दिसत आहे. लवकरच अधिकृत घोषणा होण्याचे संकेत दिले आहेत.
या संपूर्ण संघर्षात पाकिस्तान एक महत्त्वाचा ‘मध्यस्थ’ म्हणून समोर आला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर सध्या तेहरानमध्ये असून ते इराण आणि अमेरिका यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हाईट हाऊसनेही या चर्चेचे वर्णन “फलदायी” असे केले आहे. जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू व्हावी, यासाठी ट्रम्प प्रशासन आग्रही आहे.
मध्यपूर्वेतील युद्ध थांबल्यास त्याचा थेट परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होईल. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते. तसेच, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा व्यापार सुरक्षित झाल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीपुन्हा पूर्ववत होईल.
आगामी शनिवार-रविवार पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अमेरिका-इराण चर्चेकडे आता संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत. जर ही चर्चा यशस्वी झाली, तर सुरु असलेला संघर्ष थांबणार आहे.







