Crime News : धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे एका 35 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. या प्रकरणात मृताच्या पत्नीसह 7 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मृत युवकाचे नाव कृष्णाथ साठे असे असून तो गुरुवारी सकाळी गावाजवळील ओढ्याजवळ गेला होता. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी गावातील काही लोकांना त्याचा मृतदेह ओढ्याच्या काठावर झाडाखाली रक्ताच्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांच्या तपासात हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अज्ञात आरोपींनी कृष्णाथ यांच्या डोक्यात दगड घालून तसेच तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुमारे 90 फूट अंतरापर्यंत ओढत नेण्यात आला आणि झाडाखाली टाकून आरोपी फरार झाले.
या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अनैतिक संबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर मृताच्या पत्नीसह इतर काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाची मदत घेतली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू असून लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







