मुंबई: अंधश्रद्धेचा बाजार मांडून निष्पाप लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या एका भोंदू बाबाला मालाडच्या दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ‘रिधम बाबा’ ऊर्फ मॉन्टी पांचाल असं या 37 वर्षीय आरोपीचं नाव असून, तो देवी अंगात येत असल्याचा बनाव करून लोकांची लूट करत होता. विशेष म्हणजे, अवघ्या चार वर्षांपूर्वी हा बाबा चक्क एक ‘जिम ट्रेनर’ म्हणून काम करत होता.

मालाडमधील एका मैदानावर गुरुवारी आणि शनिवारी रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत या बाबाचा दरबार भरत असे. “मी तुमची भूतबाधा उतरवतो माझ्या अंगात देवी येते ,” असा दावा तो करत होता. ज्या महिलांना मूल होत नाही, त्यांना मूल होण्याचे आश्वासन देऊन तो त्यांची फसवणूक करायचा.

भोंदू बाबा कोणाकडून पैसे, तर कोणाकडून चक्क दारू, सिगारेट, कोंबडी आणि बकऱ्याचे काळीज मागत असे. तोंडाने सिगारेटचा धूर सोडत लोकांच्या अंगातील भूत उतरवण्याचे नाटक तो करत होता. त्याच्या कथित ‘राजकीय संबंधां’मुळे अनेक दिवस लोक त्याच्या विरोधात तक्रार करण्यास घाबरत होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करताच आता 60 हून अधिक पीडित नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत.
तक्रारदारांना धमकावण्यासाठी बाबा गुंड पाठवत होता. ज्यामुळे अनेक लोक घाबरून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करत नव्हते. आरोपी रिधम पांचाल हा चार वर्षांपूर्वीपर्यंत जिममध्ये तरुणांना व्यायाम शिकवत होता. तिथून त्याने भविष्य सांगण्यास सुरुवात केली आणि हळूहळू भोंदू बाबा म्हणून त्याने अनेकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.







