Loni kalbhor : पुणे-सोलापूर महामार्गावर अवजड ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघाताचा धोका निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी चौक परिसरात सोमवारी (ता.13) सकाळी साडे अकरा ते बारा यादरम्यान घडली आहे. सुदैवाने हडपसर व लोणी काळभोर वाहतूक विभागाच्या सतर्क पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला आहे. तर संबंधित चालक व सुपरवायझरविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक कैलास सौवरू यादव (वय 16, रा. आजमगड, उत्तर प्रदेश) व सुपरवायझर बाळासाहेब महादेव पालवे (वय 43, रा. लोणीकंद, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर वाहतूक विभागातील पोलीस हवालदार आरती गौरव खलचे (वय-35) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार आरती गौरव खलचे या एमआयटी चौक, लोणी काळभोर येथे कर्तव्यावर असताना त्यांना एक अवजड ट्रेलर वाहन संशयास्पद व धोकादायक स्थितीत आढळले. एमएच 46 सीएल 7336 क्रमांकाच्या अशोक लेलँड फ्लॅट ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात जड स्टील रोल लोड करण्यात आले होते. मात्र, वाहनाची कोणतीही तांत्रिक तपासणी न करता चालकाने ते थेट रस्त्यावर आणले.
एमआयटी कॉलेजसमोरील वळण घेत असताना अचानक वाहनाचे सापट तुटले आणि ट्रेलर उताराच्या दिशेने मागे सरकू लागला. या वेळी ट्रेलरवरील जड स्टील रोल खाली घसरून मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे एमआयटी चौक ते कॉलेजदरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे, पुणे शहर हद्दीत अवजड वाहनांना बंदी असताना देखील हा ट्रेलर नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर आणण्यात आला होता.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित चालक कैलास यादव व सुपरवायझर बाळासाहेब पालवे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार आरती खलचे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 119, 177 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 285 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







