Crime News: अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातून लैंगिक अत्याचाराची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी 19 वर्षीय अहमद अयान याने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. आरोपी केवळ अत्याचार करून थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून त्यांना वारंवार ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात आता पोलीस तपासातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

तपासात धक्कादायक खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अयान हा पीडित तरुणींना अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका फ्लॅटवर घेऊन जात असे. हा फ्लॅट त्याच्या एका मित्राचा होता जो एका रेसिडेन्सीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतो. याच ठिकाणी तो तरुणींवर अत्याचार करून त्यांचे अश्लील व्हिडिओ शूट करत होता. धक्कादायक बाब म्हणजे, या कामासाठी तो आपल्या मित्राला प्रत्येक वेळी 500 रुपये देत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या फ्लॅटचा वापर वारंवार अशा चुकीच्या कामांसाठी केला जात होता.
बुधवारी सायंकाळी पोलिसांनी या फ्लॅटवर धाड टाकून एका आरोपीला अटक केली आहे. या ठिकाणी इतरही अनेक मुलींना आणले गेले होते का, याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक केली असून इतर 4 जणांची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या कारवाईत 5 मोबाईल फोन जप्त केले असून त्यामध्ये 8 तरुणींचे 18 अश्लील व्हिडिओ आणि 39 फोटो सापडले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण असून पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणींनी अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.







