पुणे: गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक आधीच हैराण असताना, दुसरीकडे घरगुती गॅस चोरून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आरोपीने काही गरजू आणि अशिक्षित लोकांच्या नावावर गॅस कनेक्शन मिळवले होते. मात्र, या ग्राहकांना त्यांचे गॅस कार्ड कधीच मिळाले नाही; ते कार्ड होळकरने स्वतःकडेच ठेवले. जेव्हा या कार्डवर घरगुती सिलिंडर (950 रुपये दर) डिलिव्हर व्हायचे, तेव्हा तो त्यातील गॅस काढून छोट्या व्यावसायिक टाक्यांमध्ये भरत असे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नितीन होळकर याने अत्यंत शिताफीने हे काम केले होते.
घरगुती वापरासाठीचे हे सिलिंडर तो हॉटेल चालक आणि खाद्यपदार्थ स्टॉलधारकांना तब्बल 3 हजार रुपयांना विकत होता. म्हणजेच, घरगुती सिलिंडर तिप्पट नफ्याने विकून तो सर्वसामान्यांच्या हक्काच्या गॅसवर डल्ला मारत होता.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिसांनी हा सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.







