Crime : राजेंद्र गडगे याला संगमनेर तालुक्यात श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. मंत्रोच्चार करून कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत भक्तांकडून पैसे उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाममध्ये गडगे स्वतःला ‘महाराज’ म्हणून सादर करत होता. मंत्रोच्चाराद्वारे आजार बरे होतात, असा दावा करून त्याने मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित केले. या ठिकाणी मोठी गर्दी होत होती आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांनी आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा, आयटी कायदा, ड्रग्ज अॅन्ड मॅजिक रेमेडी अॅक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे नोंदवले.
तपासात गडगे हा भक्तांकडून 11,000, 21,000, 52,000 रुपये अशा रकमा घेत असल्याचे समोर आले. या प्रकरणात त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, तसेच सुरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.







