पिंपरी-चिंचवड: एकीकडे शहराचा विस्तार होत (Pune News) असताना जागोजागी सुरु असलेल्या बांधकामात सुरक्षेचे नियम कसे धाब्यावर बसवले जातात, याचा एक भीषण प्रत्यय जुन्या सांगवीतील पवनानगर भागात आला आहे. खेळता खेळता घराबाहेर पडलेल्या अवघ्या पावणेचार वर्षांच्या प्रियांका विश्वकर्मा या बालिकेचा, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या उघड्या पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

रात्री नेहमीप्रमाणे प्रियांका आपल्या घराबाहेर खेळत होती. खेळण्याच्या नादात ती शेजारीच काम सुरू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात पोहोचली. तिथे जमिनीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर कोणतेही संरक्षक झाकण किंवा सुरक्षेचे कुंपण नव्हते. अंधारात टाकीचा अंदाज न आल्याने प्रियांका त्यात पडली आणि तिचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. बराच वेळ मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, तिचा टाकीत पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
सांगवी पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद न करता, याला जबाबदार धरत मनीष पवार, जयराम कांबळे आणि वसंत बनसोडे या तिघांना तत्काळ अटक केली आहे.







