नाशिक: अध्यात्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अशोक खरात याच्या पापाचा घडा भरला असून, एसआयटी (SIT) तपासात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. न्यायालयाने खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, केवळ चार वर्षांत त्याने नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमध्ये तब्बल 70 कोटींचे साम्राज्य उभे केल्याचे उघड झाले आहे.

अशोक खरात हा केवळ भोंदूगिरीच नाही, तर अनधिकृत सावकारीच्या जाळ्यातून लोकांच्या जमिनी बळकावत होता, असा संशय आहे. विशेष म्हणजे, त्याचे व्यवहार हे केवळ रोख स्वरूपात झाले आहेत. कोणत्याही अधिकृत उत्पन्नाचा स्रोत नसताना इतकी मोठी मालमत्ता त्याने कशी जमवली, याचा तपास सध्या सुरु आहे.
तपासातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे कोपरगावमधील ‘समता नागरी सहकारी पतसंस्थे’त 57 खातेदारांच्या 100 खात्यांवर अशोक खरात याचे नाव ‘वारसदार’ म्हणून नोंदवले आहे. या खात्यांतून 60 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे.
या प्रकरणात काही नावे समोर येत असल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. ‘चाकणकर’ आडनाव असलेल्या व्यक्तींच्या नावे काही खाती असून, त्यातील एका खात्यावर ‘प्रतिभा चाकणकर’ असे नाव आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या बहिणीचे नावही प्रतिभा असल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, अद्याप पोलिसांनी या नावांच्या अधिकृत पुष्टीला नकार दिला आहे.







