Pune News : उरुळी कांचन, ता. 10 : ओढ्यालगत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्याचा उरुळी कांचन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ‘ए.के. वाईन्स’ समोरील ओढ्यालगत असलेल्या तीन खोल्यांच्या पाठीमागे बुधवारी (ता. 08) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मेघराज उत्तम चौधरी (वय-32, रा. चौधरीवस्ती, सोरतापवाडी), तात्यासो रामचंद्र चौधरी (वय-54, रा. निसर्ग हॉटेल मागे, माळवाडी, सोरतापवाडी), नामदेव उर्फ राहुल ज्ञानदेव चोरघे (वय-42, रा. चोरघेवस्ती, सोरतापवाडी), नवनाथ बाळासो आढाव (वय-50, रा. आढाव वस्ती, सोरतापवाडी फाटा, सोरतापवाडी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अश्वजित विनोद मोहोड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोरतापवाडी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस हवालदार अजित काळे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, ‘ए.के. वाईन्स’ समोरील ओढ्यालगत असलेल्या तीन खोल्यांच्या पाठीमागे काही लोक पैशावर जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी दोन पंचांना पाचारण करून खासगी वाहनाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन खोल्यांच्या पाठीमागे छापा टाकला असता मेघराज चौधरी, तात्यासो चौधरी, नामदेव उर्फ राहुल चोरघे, नवनाथ आढाव हे चौघेजण गोलाकार बसून पैशावर ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी त्यांना जागीच ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे रोख रक्कम 8 हजार 80 रुपये, पत्त्यांचे कॅट आणि जुगाराची इतर साधने मिळून आली.
दरम्यान, ही कारवाई पोलीस हवालदार जगताप, अजित काळे, कमलेश होले, प्रविण चौधरी आणि अमोल खांडेकर यांच्या पथकाने केली आहे. पोलीस शिपाई अश्वजित मोहोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







