पुणे: पुण्यातील (Pune News) उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात सोमवारी दुपारी एका स्पा सेंटरवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक घडले. पोलिसांच्या कारवाईला घाबरून तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने संकिता मुखर्जी या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर स्पाचा व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे.

विमाननगरमधील ‘सिटी स्पेस’ इमारतीत एका स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार, सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास विमाननगर पोलिसांनी तिथे धाड टाकली. पोलिसांनी दरवाजा ठोठावताच आत असलेल्या तरुणींमध्ये आणि व्यवस्थापनामध्ये एकच घबराट पसरली. वाचण्यासाठी संकिता मुखर्जी आणि व्यवस्थापकाने खिडकीतून थेट खाली उडी घेतली. दुर्दैवाने, जमिनीवर कोसळल्याने संकिताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. या छाप्यात पोलिसांनी इतर चार तरुणींची सुटका केली आहे.
ही घटना घडल्यानंतर जखमींना तातडीने मदत मिळाली नाही. “पोलीस सुमारे 20 मिनिटे केवळ फेऱ्या मारत होते, त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले नाही,” असा गंभीर आरोप काही स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.






