पुणे: मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोणावळा-करजात घाट परिसरात मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने १० जुलै ते १७ जुलैदरम्यान २२ नियमित आणि ८ विशेष अशा एकूण ३० रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून नुकसानग्रस्त मार्गावर युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. रुळांवर साचलेली माती आणि मोठे दगड हटवण्याबरोबरच रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम सुरू असून, यासाठी १,१०० हून अधिक कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. सध्या एक मार्ग सुरू करण्यात आला असला तरी उर्वरित दोन मार्गांवरील काम अद्याप सुरू आहे.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व रेल्वे मार्ग पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे १७ जुलैपर्यंत काही गाड्या रद्द ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गाड्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेसचा समावेश आहे.
रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, हुबळी–दादर एक्स्प्रेस, इंदूर–दौंड एक्स्प्रेस, सीएसएमटी–हैदराबाद एक्स्प्रेस आणि सीएसएमटी–चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल यांचा समावेश आहे. तसेच काही ठराविक दिवशी महालक्ष्मी एक्स्प्रेस, जोधपूर–हडपसर एक्स्प्रेस, सातारा–दादर एक्स्प्रेस, दादर–साईनगर शिर्डी एक्स्प्रेस तसेच काही विशेष गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती अधिकृत रेल्वे संकेतस्थळ, मोबाईल अॅप, हेल्पलाइन किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.







