मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे मोर्चा नेण्याची मोठी घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या आपल्या गावातून 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.गणपती स्थापनेनंतर लगेचच मराठा समाज बांधवांनी या आंदोलनाच्या तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजनानुसार हा मोर्चा दररोज सुमारे 100 किलोमीटरचा प्रवास करत वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करेल. 15 सप्टेंबरला पहिला मुक्काम पाटोदा (बीड) येथे असेल. त्यानंतर 16 सप्टेंबरला श्रीगोंदा (अहिल्यानगर), 17 सप्टेंबरला हडपसर (पुणे), तर 18 सप्टेंबरला खोपोली (रायगड) येथे मोर्चाचा मुक्काम असणार आहे. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचेल आणि तेथे जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होईल.

हा मोर्चा गणेशोत्सवाच्या काळात, म्हणजेच विसर्जनापूर्वीच मुंबईत धडकणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारसमोर उभे राहणार आहे. आंदोलन पूर्णपणे लोकशाही व शांततामय मार्गाने करण्याचे स्पष्ट निर्देश जरांगे पाटील यांनी दिले आहेत. आंदोलनादरम्यान कोणीही दगडफेक, जाळपोळ किंवा हिंसेचा मार्ग अवलंबून नये आणि वाहने अत्यंत शांततेत चालवावीत, अशी आचारसंहिता त्यांनी मांडली आहे.

जे लोक नोकरी किंवा व्यवसायामुळे मुंबईला येऊ शकत नाहीत, त्यांनी मोर्चाच्या मार्गावर येऊन आंदोलकांना आशीर्वाद द्यावेत. तसेच, ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत, त्यांनी चार दिवसांचे इंधन भरून आंदोलकांना मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मुंबईतून हक्काचे आरक्षण घेऊनच परतण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे






