पुणे : खडकी बाजारात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली आहे. विशाल दीपक काळे (वय 20, रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश दादू पातरकर (वय 17 , रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल आणि गणेश खडकी बाजारात शनिवारी(29 मार्च) कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे त्यांना एका टोळक्याने अडवले. त्यानंतर किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.
झालेल्या वादातून टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तेंव्हा विशालने त्यांच्या तावडीतून पळ काढला. मात्र, त्यानंतर टोळक्याने त्याचा पाठलाग करून त्याला होळकर पुलाजवळ गाठले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. त्याच्याकडील दीड हजार रुपये आणि मोबाइल काढून घेतला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे तपास करत आहेत.