पुणे: पुणे शहरात महिलांच्या (Pune Crime) सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून येवलेवाडी परिसरातील टिळेकरनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे खळबळ उडाली आहे. घरी परतणाऱ्या एका निष्पाप मुलीला गाठून तिला धमकावणे, जबरदस्तीने दारू पाजणे आणि तिचा विनयभंग करणे अशा संतापजनक प्रकाराची नोंद पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आशिष सुर्वे आणि अर्जुन या २० वर्षीय तरुणांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. (Latest Marathi News)

ही घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५:१५ ते रात्री १०:३० या वेळेत घडली. आरोपी आशिष सुर्वे याने रस्त्याने जात असलेल्या या मुलीला अडवून तिचा हात धरला आणि तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. इतक्यावरच न थांबता, तिला जबरदस्तीने अर्जुन नावाच्या मित्राच्या घरी नेण्यात आले. तिथे या दोघांनी पीडितेवर दबाव टाकून तिला दारू पिण्यास भाग पाडले.

मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला मारहाणही करण्यात आली. या बंद खोलीत आशिषने तिच्याशी अत्यंत अश्लील वर्तन केले. या दहशतीतून स्वतःची सुटका करून घेतल्यावर पीडितेने हिंमत दाखवून येवलेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. सहायक पोलीस निरीक्षक पठाण या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.








