मुंबई: जर तुमचे स्वप्न मर्सिडीज, बीएमडब्ल्यू किंवा फेरारीसारखी (India-EU FTA) ‘सुपरकार’ घेण्याचे आहे का? तर भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात आज अखेर ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ (FTA) अंतिम झाला आहे. या कराराचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम तुमच्या आवडत्या लक्झरी कार्सच्या किमतीवर होणार आहे.

भारत ही जगातील तिसरी मोठी वाहन बाजारपेठ आहे, पण बाहेरून येणाऱ्या तयार गाड्यांवर (CBU) असलेला प्रचंड कर हा युरोपियन कंपन्यांसाठी मोठा अडथळा होता. सध्या ४० हजार डॉलर्सपेक्षा महागड्या कारवर सुमारे ११०% आयात शुल्क लादले जाते. म्हणजे गाडीची मूळ किंमत ५० लाख असेल, तर ती भारतात येईपर्यंत १ कोटींच्या पुढे जाते. हा अडथळा दूर करण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांनी हातमिळवणी केली आहे.

नव्या करारानुसार, हा ११०% कराचा डोंगर आता टप्प्याटप्प्याने केवळ १०% वर आणला जाणार आहे. यामुळे परदेशात तयार होऊन थेट भारतात येणाऱ्या गाड्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होतील. मात्र, स्थानिक उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी केवळ २.५ लाख वाहनांच्या आयातीसाठीच ही सवलत लागू असेल.

या कराराचा सर्वाधिक फायदा लॅम्बॉर्गिनी, पोर्श, फेरारी आणि मॅक्लारेन यांसारख्या ‘अल्ट्रा-लक्झरी’ ब्रँड्सना होईल, कारण या कंपन्या आपल्या सर्व गाड्या परदेशातून थेट आयात करतात. यामुळे मर्सिडीज G-Wagon किंवा BMW M सिरीज यांसारख्या गाड्या आता अधिक कमी किमतीत मिळतील.







