मुंबई : ठाण्यातील मानपाडा भागात शिवसेना (ठाकरे गट) शाखाप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा कट रचण्यात पूर्णेकर यांचा जुना मित्र पप्या शिंदे याचा मुख्य सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.याप्रकरणी पोलीस त्याची चौकशी करत असून तो तपासात असहकार्य करत असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीनंतर पूर्णेकर आणि त्यांचा जुना मित्र पप्या शिंदे या दोघांमध्ये काही काळ दुरावा आला होता. मात्र, हत्येच्या अवघ्या 15 दिवसांपूर्वी पप्या शिंदे याने पूर्णेकर यांच्याशी पुन्हा जवळिक वाढवली. हत्येच्या दिवशी तो पूर्णेकर यांच्या कार्यालयातच उपस्थित होता. हल्ला झाल्यानंतर आपला याच्याशी काहीही संबंध नाही असा बनाव करत, “मीच पूर्णेकरांना सावरले,” असा दावा तो सर्वांसमोर करत होता.

सध्या या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करणे, फरार आरोपींचा शोध घेणे आणि हत्येमागील मुख्य हेतू स्पष्ट करणे अद्याप बाकी आहे. हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडला की सामाजिक वादातून, याचा सखोल शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा (क्राइम ब्रँच) सध्या कसून तपास करत आहे.

आता या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असून, अधिक तपासासाठी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.पूर्णेकर यांच्या मुलाने, राम पूर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दोन दिवसांपूर्वीही पप्या शिंदे कार्यालयात येऊन तास-दीड तास गप्पा मारत बसला होता. मात्र, मंगळवारी रात्री कार्यालयात पूर्णेकर एकटेच असल्याचे पाहून आरोपींनी संधी साधली.या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत







