मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गट (शिवसेना) यांच्या वतीने 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत एका संयुक्त महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या महामोर्चाच्या संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मोर्चाच्या नियोजित मार्गात शेवटच्या क्षणी बदल करण्यात आला आहे.

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आधी ठरल्यानुसार भायखळा येथून निघून आझाद मैदानाकडे जाणार होता. मात्र, सुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या कारणास्तव आयोजकांनी मार्गात सुधारणा केली आहे. आता हा मोर्चा मेट्रो सिनेमा येथून सुरू होऊन आझाद मैदानापर्यंत पोहोचेल. मार्ग बदलल्यामुळे मोर्चाचे अंतर आधीच्या तुलनेत थोडे कमी झाले आहे.रविवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मेट्रो सिनेमा परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात या मोर्चाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.

हा मोर्चा पुढे सरकत मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर पोहोचेल. तिथे या भव्य मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार असून, सभेसाठी मोठ्या व्यासपीठाची उभारणी केली जात आहे. या सभेत दोन्ही ठाकरे बंधू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर काय बोलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या मोर्चासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू असून मुंबईत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.






