पुणे: शहरातील विधी महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या चंद्रदिप सुपर मार्केट या दुकानाचे कुलूप तोडून तसेच सेंटरलॉक उचकटून रोकड आणि प्रसाधने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत दिनेश सोमाराम राठोड (वय 40, रा. कोथरूड, पुणे) यांनी डेक्कन पोलिसांत तक्रार दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दीड लाख रुपयांची रोकड आणि प्रसाधने चोरले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विधी महाविद्यालय रस्त्यावरील चंद्रदिप सुपर मार्केट या दुकानात 11 आणि 12 एप्रिलच्या रात्री घरफोडीची घटना घडली. 11 एप्रिलला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप कापुन तसेच सेंटरलॉक उचकटुन दुकानातील 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड आणि प्रसाधने चोरून नेले. चोरीचा प्रकार लक्षात येताच फिर्यादी दिनेश यांनी तातडीने डेक्कन पोलिसांत फिर्याद दिली.
डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत, उपनिरीक्षक अजय भोसले, सहायक फौजदार पारगे, डेंगळे, उपनिरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.