Pune Crime : पुणे, ता. 18 : चंदननगर परिसरात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक खून प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून एका विवाहित महिलेचा अमानुष छळ करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलिसांनी अवघ्या 6 तासांच्या आत जेरबंद करत तपासातील चपळाई आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश उध्दवराव मुन (वय 39, रा. गणेशनगर, येरवडा) यांच्या पत्नी पुनम मुन हिचे अॅड. संजय दत्तात्रय सावंत यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय निर्माण झाला होता. या संशयाने विकोपाला जात अॅड. सावंत यांची पत्नी स्वाती सावंत, त्यांची मुलगी आणि स्वतः अॅड. संजय सावंत यांनी एकत्रितपणे भीषण कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
16 एप्रिल दुपारी 2 वाजल्यापासून ते 17 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत, चंदननगर येथील जुना मुंढवा रोडवरील अॅड. सावंत यांच्या कार्यालयात हा थरारक प्रकार घडला. आरोपींनी पुनम मुन हिला जबरदस्तीने ताब्यात ठेवून तिचे हातपाय दोरीने बांधले. त्यानंतर तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर क्रिकेट बॅटने आणि धारदार शस्त्राने वारंवार प्रहार करत तिला अमानुष छळ दिला. या क्रूर मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाला.
घटना उघडकीस आल्यानंतर चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 103(1) (खून), 61(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (सुधारणा) अधिनियम 2015 अंतर्गत कलम 3(2)(va) नुसार गंभीर गुन्हा नोंदवला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाला वेग दिला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. अवघ्या 6 तासांच्या आत पोलिसांनी अॅड. संजय सावंत आणि त्यांची मुलगी यांना ताब्यात घेतले, तर मुख्य महिला आरोपी स्वाती सावंत हिला गुन्हे शाखेच्या खंडणी विभाग-2 पथकाने अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून, वैयक्तिक संशय आणि मत्सर किती भयंकर परिणाम घडवू शकतो, याचे हे गंभीर उदाहरण ठरले आहे.
ही कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे, नुतन पवार तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख आणि त्यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली. तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विभाग-2 चे पोलीस निरीक्षक राम राजमाने व त्यांच्या पथकाचेही या कारवाईत महत्त्वपूर्ण योगदान राहिले.







