पुणे: महाराष्ट्राच्या शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यात राजकीय हस्तक्षेपाचे प्रकारही समोर येत आहेत. अशातच कोंढवा परिसरात माजी नगरसेवकाच्या जावयाने गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माजी नगरसेवक गफूर पठाण यांचा जावई आणि त्याच्या साथीदारांनी मंगळवारी ( 5 ऑगस्ट) मध्यरात्री कोंढवा परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करत वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

वाहनांची मोडतोड, परिसरात खळबळ
दहशत माजवण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या तोडफोडीत अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून, काही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. अचानक मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पोलिसांची चौकशी सुरू, अद्याप अटक नाही
या प्रकाराबाबत कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सतत वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना आणि त्यामागे दिसणारा राजकीय पाठबळाचा आरोप यामुळे पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
कोंढवा परिसरातील ही घटना केवळ तोडफोडीपुरती मर्यादित न राहता, गुन्हेगारीच्या वाढत्या प्रवृत्तींना खतपाणी घालणारी असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.







