पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune Crime) परिसरात लोकप्रिय असलेल्या ‘पाना’च्या नावाखाली धोकादायक अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. ‘कडक फुलचंद’ या नावाने विकल्या जाणाऱ्या पानामध्ये पांढऱ्या पावडरच्या स्वरूपात घातक ड्रग्ज मिसळून ग्राहकांना दिले जात असल्याचे समोर आले असून, यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

लोणी काळभोर, हिंजवडी आणि चिंचवड या तीन ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच वेळी छापे टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. लोणी काळभोर येथील ‘मैफिल पान हाऊस’मध्ये मिळणाऱ्या पावडरमध्ये अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स आणि मेथॅम्फेटामाइनसारखी मेंदूवर गंभीर परिणाम करणारी द्रव्ये आढळली. या प्रकरणी कैलास मांढरे आणि अनुराधा मांढरे या दांपत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
तपास पुढे नेत पोलिसांनी हिंजवडीजवळील जांबेगाव येथे ‘चैतन्य फूड गोडाऊन’वर छापा टाकला असता, येथेच या नशिल्या पावडरचे उत्पादन होत असल्याचे उघड झाले. या ठिकाणाहून सुमारे 6.63 लाख रुपयांचा मुद्देमाल, संशयित द्रावण आणि एक कार जप्त करण्यात आली. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरातील ‘मंगलमूर्ती पान स्टॉल’वरूनही 710 ग्रॅम अंमली पदार्थ मिश्रित पावडर जप्त करत ज्ञानेश्वर वानखेडे याला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमागे नागरिकांच्या तक्रारी निर्णायक ठरल्या. पान खाल्ल्यानंतर अचानक गुंगी येणे, चक्कर येणे अशा तक्रारी वाढत होत्या. यानंतर पोलिसांनी पोर्टेबल ड्रग्ज टेस्टिंग किटचा वापर करून घटनास्थळीच तपासणी केली आणि हा प्रकार उघडकीस आणला.
या प्रकरणातून शहरात अंमली पदार्थांचा वाढता धोका अधोरेखित झाला आहे. सहज उपलब्ध असलेल्या पानासारख्या पदार्थातून नशा पुरवली जात असल्याने विशेषतः तरुणांवर याचा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आता या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि त्यामागील आंतरराज्य साखळीचा शोध घेत आहेत.







